Manogat

मनोगत

आज वयाच्या  पंच्याहात्तराव्या  वर्षात पदार्पण करीत आहे, माझा पंच्याहत्तराव्या वर्षातला प्रवेश तुम्हा सगळ्यांना आनंदाचा क्षण आहे आणि मलाही आजचा दिवस अभिमानास्पद वाटतो.  एकीकडे पार केलेला प्रदीर्घ काळ व दुसर्‍या बाजूला मोजके राहिलेले वर्षे स्पष्ट दिसत असल्याने काळजाच्या एका कोपर्‍यात हुरहुरीने जागा घेतल्या सारखे वाटते.आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा हे गीत तरुणांसाठी त्यांनी उत्तुंग शिखर काबिज करावे म्हणून गायले असले तरी वृद्धानी भौतिक सुखाला तिलांजली देवून मोक्ष गाठवा असाही अर्थ ह्या गाण्यात अभिप्रेत आहे. भूत काळाकडे बघताना आपण किती पुण्याची कामे केली आणि किती अपराध केले हे जाणून घ्यायला हवे. खरेतर रोजचं सूर्योदयापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभ्ररात काय चांगले काय वाईट कृत्य केलीत ह्याचा आढावा घेतला पाहिजे व हे मीअजूनही करीत आहे. . गत आयुष्यकडे बघून समाधानाची बाजू भक्कम असल्याचे मला जाणवते व ती मजबूत  असण्याला माझ्या प्रकृतीचे स्वास्थ्याला प्रथम क्रमांक द्यावा  लागेल व तुमचे सगळ्यांचे माझ्यावर असलेल्या प्रेमाला दूसरा क्रमांक व तिसरा क्रमांक  म्हणजे मला  कधी आर्थिक चणचण भासली नाही, पगार आम्हा दोघांचा जरी  तीन अंकी होता तरी आर्थिक नियोजन करणे साध्य झाले व आज कुणाचे देणे लागत नाही हे समाधान आहे,

आयुष्यात खूप बघितले, खूप सोसले, भोगले असे माझ्या वयाचे म्हणत असतातच  पण मी तसे म्हणणार नाही,  गतकाळात पाहिले ते आजही दिसते आहे ,फक्त त्याचे स्वरूप बदलले एवढेच. काय भोगले हे महत्वाचे आहे, कारण जे भोगले त्याची पुंनरावृती होऊ शकत नाही. त्या त्या वयामध्ये आनंद दू:ख जे भोगले त्याची  तुलना आज करता येत नाही इतकेच नाही तर तसा काळ व परिस्थितीची आज निर्मिती होणे शक्य नाही म्हणून त्या काळातले सुखदू:खाचे क्षण जे काळजावर कोरल्या गेलेत ते पुसल्या जात नाहीत व पुसल्या जावूही नाही. वाट म्हटली की खाचखळगे,वेडीवाकडे वळणे, घाट, रस्त्याच्या बाजूची रम्य हिरवळ जशी असते तसाच प्रकार आयुष्याच्या वाटेचा असतो, त्या वाटेने जे अनुभवले असते तीच खरी साठवलेली पुंजी असते व त्याच पुंजीने शहाणपण, निर्धार,कसब आणि बळ प्राप्त झालेले असते.

गरीब, श्रीमंत ह्याला माझ्या कक्षेत स्थान नाही त्याला मी महत्व कधीच दिले नाही. मी वयाने, बुद्धीने कर्तव्याने जे  मोठे आहेत  त्यांना जवळ केले. प्रथम गणगोत  नंतर सखे, मित्र जवळ केले व त्यांच्याच पाठिंब्यावर मी अजूनही ताठ उभा आहे. मी एकला चलो असे कधीच झाले नाही, एकटा कधी राहिलो नाही. काका, मामा आत्या,मावशी ह्यांच्या सान्निध्यात होतो ते निवरतले, त्यांची मुले, माझी भावंड  ह्यांचा सतत सहवास लाभला व लाभतो आहे म्हणूनच मी एकला  आहे जाणवत नाही.स्वार्थाला माझ्या जवळ फटकुही दिले नाही पण आयुष्य सुकर करण्यासाठी कुणाची प्रेमळ सहानुभूती व प्रेरणा मिळावी म्हणून स्वार्थ साधला.

माझा स्वभाव हट्टी, कोणतीही गोष्ट मनात आली की करायचीच किवा करून घायची हा माझा स्वभाव. मनात आलेली गोष्ट साकार होई पर्यन्त धीर नसतो. धीर धरणे जमलेच नाही. कधीकधी असल्या अधीर वृतीमुळे नुकसानही झाले. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत घरात आजोबा {अण्णा} आजी {नानी } काका {त्यांचे लग्न व्हायचे होते} आई {वहिनी }वडील {बापूसाहेब} ह्यांचे डोक्यावर चढलो व लाडवलो होतो हेच हट्टी होण्याचे कारण आहे. आता नातवांचे  हट्ट पुरविताना वाटते माझे हट्ट पुरविताना आई वडिलांना मी  किती त्रास दिला असेल.

मी कशाला घाबरलो नाही, तीन बिकट प्रसंगाला धैर्याने तोंड दिले व  बाजी मारली ह्याला कारण माझा कर्मावर विश्वास आहे. देवावर, कुलदेवतेवर असलेली श्रद्धा कोठल्याही बिकट प्रसंगातून तारून नेते ह्यावर पूर्ण विश्वास आहे. उपासतापास करणे जमले नाही.

वाचनाची गोडी आहे, विविध विषयाची पुस्तके वाचतो, मुलांच्या अभ्यासाची पुस्तके सुद्धा वाचतो. माला भीती वाटते ती परीक्षेची, गणित कधी जमलेच नाही व जमणार सुददा नाही खात्री आहे. साधा बाजार करायचा तर तोंडी हिशेब करणे जमत नाही. भीती वाटते ती झाडावर चढण्याची , गरम तेलात मोहरी फुटताना अंगावर डोळ्यावर उडेल ह्याची भीती वाटते,

माझ्या मोहनकुमार नावापेक्षा “बाळ” ह्या टोपण नावानेच माला सर्व कुटुंबीय मित्र ओळखतात. कधी मी सखूबाईचा {आईचे माहेरचे नाव } बाळ बापुचा बाळ म्हणून ओळखला जातो. ते जीवंत असे पर्यन्त कधी मोठा झालो कळलेच नाही. आम्ही दोघेच भाऊ बहीण लहानपणी खूप भांडत असू पण आज आमचे एकमेकाशिवाय पान हालत नाही.भंडायला खूप आवडते, आपलेच म्हणणे बरोबर म्हणून वाद होतच राहतात व तेथेही हट्टामुळे बाजी मारल्या जाते व कधी पराभव स्वीकारावा लागला तर कोठे आपण चुकलो कमी पडलो ह्याचा शोध घेई पर्यन्त स्वस्थता जीवाला नसते. राग अगदी नाकाच्या शेंड्यावर आहे, पारा चढतोही व लवकर उतरतोही.

लहान खेड्यापासुन मोठ्या शहरा पर्यन्त प्रवास केला असल्याने सामाजिक जीवन कसे असते हे न्याहाळू शकलो. शहरी व ग्रामीण लोकांमध्ये राहण्याचा योग आला, मेळघाटातल्या आदिवासी बरोबर चार दिवस राहण्याचा प्रसंग स्मरणीय आहे. माणसानी  सर्व स्थरामधील लोकांच्या जीवन शैलीचा अभ्यास करायला हवा. माला कधीच कुणाचा दर्जा हुद्दा, पत ठरवता आला नाही परंतु ज्याला जो मान द्यायचा तो देतच गेलो. स्वत:चा अपमान करून घेतला नाही पण उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना एक पावुल मागे घेण्यात संकोच वाटला नाही, पण तो स्वत:साठी स्वत:च्या स्वार्थासाठी नाही तर कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून.  

प्रत्येक पुरुषाचे मागे स्त्री ही त्याच्या शक्तीचे रूपाने ऊबी असते म्हणूनच  अहमहमिका , धडपड संघर्ष, ह्याचा आस्वाद घेतला व शरीर स्वास्थ्य, आर्थिक सामर्थ्य टिकविण्याला व आयुष्याची वाट सुकर होण्याला हिचा [रोहिणीचा]  सहवास लाभाल्याने यशस्वी होणे शक्य झाले. माझी ती नुसती सहचारिणीच नाही तर माझी स्फूर्ति, प्रतिभा सुद्धा आहे. आमच्या वयात दोन वर्षाचे अंतर असल्याने   उताररवया मध्ये होणार्‍या शारीरिक समस्या जवळजवळ सारख्या आहेत. शारीरिक बळ कमी झाले असले तरी आम्हा दोघाचा जोम, उत्साह ताजा आहे. अजूनतरी कुणी पिकल पान म्हणून संबोधले नाही  हीच जीवनसफल्याची पावती आहे. सगळ्यांशी नाते जोडून आहे,प्रत्येक  प्रसंग तो घरचा वा दुसार्‍याकडचा असो आमची हजेरी आवर्जून असतेच. आम्हा दोघांच्या अवडीनिवडी सारख्याच असल्याने हवे तसे मिळत गेले, विशेषत: गोड पदार्थ वेळोवेळी व भरपूर खाऊन फस्त केले. कपड्यांची खूप आवड तसेच बाजारात काही नवीन वस्तु आली की ती घरी आणल्याच जायची.

नागपूरला राहायला आल्या पासून माझे सगळेल्च आप्त आणि मित्र माझ्याकडे आलेले आहेत व आजही येत आहेत माला ह्याचे समाधान आहे की कुणी माझेकडून विन्मुख गेला नाही, असेही असून सद्द्य परिस्थितीत माझ्या अंगाखांद्यावर खेळलेले आता मोठे झाले, कमावते झाले व आजच्या धकाधकीच्या जगामध्ये धावणेच त्यांच्या नशिबी आल्याने व कार्याबहुल्यामुळे  माझ्या पासून दुरावले येथे मात्र मी माला अपयशी समजतो.

जीवनपटाचे अवलोकन करताना वाटते मनाने नसलो तरी शारीरिक थकवा जाणवतो व गाण्याच्या पंक्ति आठवतात .... स्वत: भोवती घेता घिरट्या अंधपणाकी आला, तालाचा मज  तोल कळेना सादही गोठून गेला अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला थकले रे नंदालाला.आता वार्धक्यात थकवा वाढणार, गात्रं कमजोर होणार, वार्धक्य आल की वाटत सगळ्या गोष्टी आवाराव्यात , हळूहळू मुलांवर सर्व गोष्टी सोपवाव्यात व आपण शांत व्हावे. तारुण्याचे सौंदर्य उपभोगले, वर्ध्याक्याचेही एक वेगळे सौंदर्य असते, लहानांचे कर्तुत्व, निर्णय बघावेत, ते मान्य करावेत म्हणजे वार्धक्य सुंदर दिसते. मनाशी ठरवले, आपल्यापासून कुणाला त्रास नको म्हणून त्यांच्याच कलाने वागायचे हट्ट कशाचा धरायचा नाही पटत नसले तर उगाच ती गोष्ट जबरदस्तीने गळी उतरवायची नाही , मुलं मोठी झालीत ते आपल्या प्रपंचात गढले गेलेत त्यांच्या संसारात लुडबूड नको, बघूया यातले काय जमते ते . त्यांनी मिळविलेल्या यशाचा  माला अभिमान आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगति होवो, त्यांचा संसार सुखाचा, निरामय व समृद्धीचा असावा हीच अपेक्षा व त्यासाठी त्यांना आमचे खूप खूप  शुभाशीर्वाद.

[बाबा व आई]


Comments

Popular posts from this blog

Muhurta for Travel

मालव्या योग

वार क्रम