Upekshit Kaan
चार चौघे एकत्र
आले व समवयस्क असतील तर त्यांच्यामध्ये होण्यार्या गप्पाचा विषय एकच नसतो, विविध विषयावर चर्चा होते. काही विषय
गंभीर असतात तर काही चित्ताला समाधान देणारे असतात. काही विषय त्याला शेंडा ना बुड
पण तोही विषय तिखटमिठ लावून चर्चिल्या जातो. बालपणा पासून ते वृद्धावस्ते पर्यन्त
समवयस्कएकत्र आले तर चर्चेला उधाण येते. असा एखादाच असतो की तो कोणत्याच विषयात रस
घेत नाही. पण तो सर्व गोष्टी कान लावून ऐकतो पण मौन धरून असतो.
विषय कोणताही
असो तो चघळताना वा चर्चिल्या जाताना कानाला जागृत असावे लागते. एकमेकामद्धे होत
असलेली बडबड कानाला ऐकाविच लागते, तसे कान फार तीक्ष्ण असतात कोठे काही खूट्ट झाले की कान
टवकारल्या जातात.
कान चेहर्याला
चिकटून असतात, पण ते दुर्लक्षिल्या जातात. चेहर्याचे सौंदर्याचे वर्णन
किती किती केल्या जाते,नाकी डोळी सुंदर पण कानी डोळी सुंदर म्हटल्या जात नाही, अगदी
डोक्यावरच्या केसा पासून तर हनुवटी
पर्यन्त. केस कसे लांबसडक आहेत,कुरळे आहेत टक्कल पडलेले डोके सुद्धा चेहर्याचे सौंदर्य
खुलविते. चांगले गौरवर्णी टक्कल असलेला माणूस मोठा विद्वान व गर्भश्रीमंत समजल्या
जातो. कपाळ कसे रुंद व उठावदार असले की लगेच तो भाग्यवान समजल्या जातो. चेहर्याचे
सौंदर्य भुवया पण वाढवितात, डोळ्यांवर तर कित्येक कवी लट्टू होऊन डोळ्यांवर काव्य
रचतात. एक डोळा जरासा बारीक असला तरी त्या माणसाला चालबाज म्हणून ओळखल्या जाते.
गाल सुद्धा किती मऊ असतात, लहान मुलांचे गालगुच्ये घेण्यात मौज वाटते. चेहर्याचे खरे
सौंदर्य नाकात असते, नाकाखाली मिसरूड तिची विविध पद्धतीची ठेवण असते अथवा ती
चेहरेपट्टिला नकोशी होते तेव्हा साफ केल्या जाते .ओठसुद्धा चेहर्यावर खुलून
दिसतात. ओठ उघडे झाले की दाताची कवळी सुद्धा वाखणल्या जाते. पांढरे स्वछ दात चेहर्यावर
खुलून दिसतात. व मग हनुवटीचा नंबर लागतो, हळणूवटीलाही हात लावावसा वाटतो. येवढे सर्व
चेहर्यावर प्रत्यक्ष दिसणार्या गोष्टीचे वर्णनच केल्या जात नाही तर कवि लेखक
पानेच्या पाने त्यावर लिहतात पण बिचारे कान मात्र दुर्लक्षिल्या जातात. त्यावर कोणी भाष्य करीत नाही व लिहितही नाही. वास्तविक बिना
कानाचा चेहरा बघितल्याच जात नाही, कान असा उपेक्षिल्या का गेला कळत नाही.
कानाने संगीत, गाणे, ऐकली जातात, तद्वतच
मोठमोठ्या विद्वानाचे विचार ऐकिल्या जातात वाहवा केल्या जाते पण माझ्या कानाने
ऐकिले असे कोणी म्हणत हानी. शिवी जर कुणी हासडली
व ती कानावर पडली तर मात्र तळापायची आग मस्तकात जाते व भयंकर स्थिति
निर्माण होते. कुणी जर म्हटले की मी असे बोललोच नाही तर माझा माझ्या कानावर विश्वास आहे कानाने मी ऐकिले म्हणून रुजवात
केली जाते.
कांनावरून
खिजविल्या जाते, कुणाला कानफाट्या, कानमोड्या
म्हटले जाते, इतकेच नव्हे तर कानखोजे
, कानफाडे, काने, कानधारे, कानमोडे असले आडनावेही प्रचलित आहेत. कधी कधी कान कोंडीला सामोरे जाण्याची पाळी येते व कधी कधी चांगली
कानामागे लावल्याही जाते. कान धरून उठाबश्या प्राथमिक शाळेत काढण्याची शिक्षा
असायची.
कान म्हणजे
कर्ण, तो महाभारतातला दानशूर आठवतो, कर्ण नाव कसे पडले त्याचा कानाशी काहीही
संबध नाही, रामायणातील
कुंभकर्ण त्याचाही कानाशी काही संबध नाही, झोपला की
त्याचे कानाशी कितीही टाहो फोडा, बोंबला तो गाढ निद्रेतच.
कानाची ठेवण वेगळी वेगळी असते. कुणाचे कान चेहर्याला
चिकटून असतात, कुणाचे चेहर्या बाहेर आलेले दिसतात, कुणाचे कान
डोळ्यात भारतील असे लहान असतात, असले लोक माहा धूर्त असतात. कानाच्या पाळया बहुधा चेहर्याला
चिकटून असतात व चिकटून नसल्या व लोंबकळत असल्या तर ती व्यक्ति साधू संतांच्या रांगेतली असते.
कानाचे सौंदर्य
स्त्रिया मात्र कानामध्ये डूल कुड्या घालून वाढवितात, प्राचीन
काळी पुरुष सुद्धा कुंडले कानात घालीत, पेशवाईत तर
विद्वान, महापराक्रमी, चाणाक्ष, राजकारणपटु अशा पुरूषांच्या कानात भिकबाळी घालून त्यांचा
गौरव केल्या जयचा.
कानाचे कार्य
फार मोलाचे आहे. राजदरबारी कर्णपिशाच्य [हेर] असायचे त्यांचे काम येवढेच की कानावर
आलेली बातमी राजा पर्यंत पोहचावायची . कानाने काय ऐकावे काय ऐकू नये हे मन ठरविते
उगीच काही बडबड, टीका ऐकायची नसली तर ऐकू येणारे शब्द एका कानाने ऐकायचे
आणि दुसर्या कानाने सोडून द्यायचे असा सल्ला दिला जातो. पण असेही महाभाग आहेत की
ते दोनही कानांनी ऐकतात व तोंडावाटे
ऐकलेले जाहीर करतात.
भिंतीला कान
असतात असे म्हटल्या जाते म्हणजे काय तर
चोरून कान टवकारून ऐकण्याची कुणाला सवय असते अशा लोकांपासून दोन हात दूर राहावे
लागते. कानाडोळा करणे म्हणजे काय तर नसला तरि बहिरेपण अंगी बाणणे. आपण काहीच ऐकले नाही बोवा
म्हणून कानावर हात ठेवून मोकळे होणारे समाजात असतात. कान देऊन जो ऐकतो तो चिंतन
करून त्यावर सारासार विचार करून आपले मत प्रदर्शित करतो. न्यायाधीश वादी
प्रतिवादीची बाजू ऐकून, सखोल विचार करून न्याय देतो.
कानाची किमत
होते ती विवाह प्रसंगी, जावयाचा कान पिळण्याचा कार्यक्रम मजेदार असतो, वधूचा भाऊ
जावयाने खिशात दोन हजारची नोट पडल्या वरच कान सोडतो.
कानाला त्रास
होतो कर्कश आवाजाचा. कानठळ्या बसायला लागल्या की माणूस वेडापिसा होतो व असहय झाले
की तो वाट फुटेल त्या दिशेने सैरावैरा पळत सुटतो. आनंदाच्या वेळी कानात वारे
गेलेकी सुद्धा तो धावत पळत असतो.
कान जर नसते तर
माणूस चष्मा डोळ्यावर लाऊ शकला नसता त्याला कानाचा आधार टेकू लागतो. डॉक्टर
स्टेथस्कोप लावून रोगाचे निदान करतात आहे.
कान फार संवेदनशील व नाजुक असतात. उन्हात भटकण्याची वेळ आली तर रुमालने कान झाकून
फिरावे लागते. कानात विष ओतल्या जाते म्हणजे त्याला दृष्ट प्रवृतीकडे नेल्या जाते.
हाच काय तो कानाचा व्यावहारिक उपयोग आहे.
[बाळ लोखंडे] नागपुर मो. 9273072928.
कानावर एव्हढे काही लिहिता येते ह्याचा कधी विचारच केला नव्हता...लेखकाच्या प्रतिभेला सलाम
ReplyDelete