Muhurta for Travel

वर्तमान काळात यात्रेचे स्वरूप बदलले व त्याला पर्यटन म्हटल्या जाऊ लागले. यात्रा, पर्यटन किंव्हा प्रवास म्हटले कि एक वेगळाच उत्साह, आनंद असतो. पूर्वी यात्रा फार कठीण असायच्या, अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. पण आजची काळात यात्रा सुखकर होण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. बस, आगगाड्या, जहाजे, विमाने, खासगी गाड्या, भाड्याच्या गाड्या, वगैरे वगैरे. त्यामुळे प्रवास कमी वेळात होतो. अन्तर कमी वाटते. पण अडचणींवर मात्र मात करता येत नाही. कधी प्रवास सुखाचा होतो तर कधी अति त्रासाचा, दगदगीचा, मानसिक त्रासाचा होतो. जेवढे वेगवान वाहने निघालीत तेवढीच अपघाताची तीव्रता वाढली. कित्येकदा आपण बघतो कि वातावरणाची साथ नसल्यामुळे यात्रा रद्द होतात, किंव्हा ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला विलंब लागतो, वेळेत पोहोचून सुद्धा ठरलेले काम होत नाही. अशा बर्याच अडचणींना समोर ठेऊन आपल्या पूर्वजांनी यात्रा सुखाची व्हावी म्हणून काही नियम सांगितलेत. केंव्हा करावी अथवा केंव्हा करू नये ह्यासाठी मुहूर्त काढून दिलेत. ग्रहांची अनुकुलता लाभण्यासाठी यात्रेस निघतांना काही नियम लाऊन दिलेत.

कोणच्याही कार्यसीद्धीसाठी किंव्हा कोणच्याही कामाच्या उद्देशाने एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाण्याला यात्रा म्हणतात अशी मुहूर्त चिंतामणी मध्ये यात्रेची व्याख्या दिलेली आहे. मुहूर्तचिन्तमणी हा ग्रंथ सर्व मुहूर्त विषयीच्या ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यातच यात्रेचे दोन भेद हि नमूद केलेत एक म्हणजे सामान्य यात्रा व दुसरा प्रकार म्हणजे युद्ध यात्रा. सामान्य यात्रा हि व्यावहारिक कार्यासाठी केली जाते जसे, नोकरी, तीर्थ दर्शन, द्रव्यार्जन, संमेलन वगैरे, ह्या यात्रेस जातांना तिथी , वार व नक्षत्रांची शुद्धी बघितली जाते.

पूर्वी दुसर्या राज्याला जिंकण्यासाठी युद्ध यात्रासाठी विशेष मुहूर्त बघितले जायचे. हे मुहूर्त कसे बघवे ह्याबद्दल आपल्या धर्मग्रंथात, वराहमिहिरांनी बनवलेल्या योगयात्रा सारख्या युद्धयात्रिक ग्रंथात सांगितले आहे. युद्ध यात्रेचे मुहूर्त युद्धात विजय मिळण्यासाठी बघितले जायचे.

आजच्या काळात यात्रेसाठी मुहूर्तावर अवलंबून राहणे निश्चितच शक्य नाही, परंतु अति महत्वाचे कार्य असता किंव्हा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने निदान वार, तिथी, दिशाशूल आणि नक्षत्र एवढे तरी बघावे किंव्हा जाणकारांचा सल्ला घ्यावा.

सोमवारी आणि शनिवारी जर ज्येष्ठा किंव्हा मूळ नक्षत्र असेल तर पूर्व दिशेला यात्रा अशुभ मानावी. श्रवण, धनिष्ठा, शततारका, पु.भाद्रपदा, उ.भाद्रपदा व रेवती आणि अश्विनी नक्षत्र असून गुरुवार असल्यास दक्षिणेकडची यात्रा टाळावी. रविवार आणि शुक्रवारी रोहिणी व पुष्य नक्षत्र असता पश्चिम दिशेला जाऊ नये. तसेच उ.फाल्गुनी नक्षत्र जर मंगळवारी व बुधवारी पडत असेल तर उत्तर दिशेचा प्रवास अशुभ मानावा. ह्या प्रमाणे नक्षत्रशूल व वारशूल बघावे. हे फक्त मुख्य चार दिशांचे वार शूल आहेत कोन दिशांचे वारशूल सुद्धा बघावे सोमवारी आग्नेय कोन, गुरुवारी नैवृत्यकोन, शुक्रवारी वायव्य आणि बुधवारी व शनिवारी ईशान्य कोन हे वारशुल मानावे. व ह्या वारी ह्या दिशांना प्रवास करू नये असे शास्त्र ( मुहूर्तशास्त्र सांगते).

        दिशाशूलही समजण्यास अगदी सोपे आहे. कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्र, पुनर्वसू, आश्लेषा, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपद, उत्तर भाद्रपद, रेवती, अश्विनी, भरिणी ह्या नक्षत्रान मध्ये जेंव्हा चंद्राचे गोचर असते (ह्या नक्षत्रातून चंद्र जेंव्हा भ्रमण करीत असतो) तेंव्हा आग्नेय, दक्षिण, नैवृत्य आणि पश्चिम  ह्या दिशा दिशाशूल समजाव्यात व ह्या दिशेला प्रवास अशुभ मानावा. तसेच चंद्राचे गोचर जेंव्हा मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्र, स्वाती, विशाखा, अनुराधा,  जेष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, उत्तराषाढा, अभिजेत आणि श्रवण ह्या नक्षत्रातून होत असते तेंव्हा पूर्व, ईशान्य, वायव्य  आणि उत्तरेचा प्रवास दिशाशूल असल्यामुळे टाळणे चांगले. 

ह्या साठी मुहूर्त चिंतामणी मध्ये परीघ दण्डचा उपयोग केलेला आहे. दिशा शूल किंव्हा परीघ दण्डकचा परिहार तेंव्हाच होतो जेंव्हा राशी संबोधित दिशा लक्षात घ्यावा , जसे उदारणार्थ मेष- सिंह- धनु ह्या राशींवरून पूर्वेचे लग्न असल्यास , वृषभ – कन्या – मकर ह्या राशी दक्षिण दिशेचे लग्न असल्यास, मिथुन – तुला – कुंभ पश्चिम दिशेचे लग्न असल्यास,  कर्क - वृश्चिक - मीन उत्तर दिशेचे लग्न असल्याचा होतो. म्हणजे ज्या दिशेला जायचे त्या राशीला लग्न धरायचे. प्रवास परीघ ओलांडून करायचा असल्यास लग्नाची शुद्धी बघावी. लग्नाला पापग्रह पाहत असल्यास शुद्धी होणार नाही. म्हणजे त्या भागाला जाने योग्य नाही –शुभ ग्रहाच्या दृष्टीत लग्न असल्यास किंव्हा योग किंव्हा शुभ त्या राशीच्या वर्गात असल्यास त्या दिशेची शुद्धी होते.

काही नक्षत्र हे चारही दिशांसाठी शुभच असतात, ह्या साठी परीघ बघण्याची आवश्यकता नाही. अनुराधा, हस्त,पुष्य आणि अश्विनी ह्या चारही नक्षत्रात परीघ उल्लंघन दोषावाह नाही. ह्या चारही नक्षत्रात चारही दिशांची यात्रा शुभच असते. यात्रे साठी दिवस ठरवतांना केंद्रात वक्री ग्रह किंव्हा वक्री घार्हांच्या वर्गात लग्न येत असल्यास तो दिवस निषिद्ध असतो. तसेच कुंभ लग्न आणि कुंभ नवांशात लग्न पडल्यास तो दिवस यात्रेसाठी टाळावा कारण या योगात पदोपदी द्रव्य हानी होत असते.   

तसेच राहू ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्रापासून पुढील नक्षत्रे जीवपक्षाची नक्षत्रे असतात व त्या नक्षत्रांच्या आधीची नक्षत्रे मृत पक्षाची  नक्षत्रे असतात. जेंव्हा सूर्य मृत पक्षात असतो आणि चंद्रमा जीव पक्षात असतो तेंव्हा यात्रा शुभ असते. ह्याचे विपरीत असता यात्रा नाश करणारी असते. जर सूर्य चंद्र दोघेही जीव पक्षात असतील तर यात्रा निश्चितच शुभ होईल. आणि दोघेही मृत पक्षात असतील तर यात्रा अतिशय अशुभ फलदायी होईल.

यात्रेचा दिवस ठरवतांना एक साधेसे गणित करून बघावे म्हणजे येणाऱ्या अडचणींना शह देण्याची तयारी ठेवावी. यात्रेच्या दिवशीचे तिथी, वार, व नक्षत्र यांच्या संख्येची बेरीज करून ती तीनदा वेगवेगळी लिहावी नंतर एकदा त्या संखेला ७ ने ,नंतर त्याच संखेला ८ ने , परत त्याच संख्येला ३ ने असे ७, ८ आणि ३ने अनुक्रमे भागावे. ७ ने भागून शून्य शेष उरल्यास प्रवासात कष्ट होतील, ८ने भागून शून्य शेष राहिल्यास यात्रेत धनाची कमतरता होईल, ३ने भागून शून्य शेष राहिल्यास जीवाला धोका किंव्हा शारीरिक कष्ट होण्याची संभावना असते.

आपल्या आपल्या जन्म राशीनुसार कुंडलीत घात तिथी व  वारचा उल्लेख केलेला असतो किमान यात्रेची योजना आखतांना तेवढे तरी विचारात घ्यावे. तसेच पंचांगात दग्धयोग, मृत्यू योग दिलेले असतात हे योग प्रवास वा यात्रेस प्रशस्त समजल्या जात नाहीत. हिवर, घबाड आणि गौरव योग यात्रेस उत्तम असतात.    

ह्या सर्व गोष्टी एखादी यात्रा ठरवायचे असल्यास विचारात घेऊ शकतो. पण आज सर्वच लोक रेल्वेचे आरक्षण विचारात घेऊन दिवस निवडतात. कारण यात्रेकरू वाढलेत, सोयी जरी बर्याच असल्या तरी सर्वसामान्यपणे दूरचे प्रवास हे रेल्वे, विमानाने, किंव्हा क्वचित जहाजाने केले जातात. अश्यावेळी तिकीटाची, आरक्षणाची उपलब्धता लक्ष्यात घेणेच श्रेयस्कर असते. अश्या परिस्थितीत त्यातल्यात्यात आधी सांगितलेल्या बाबीं विचारात घेऊन एखादा चांगला दिवस ठरवता येतो. पण कधी अचानक प्रवासाचा बेत करणे महत्त्वाचे होऊन बसते, जसे नोकरीसाठी मुलाखत, स्पर्धा, परीक्षा, व्यापार वा व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास, अनेक प्रकारच्या महत्वाच्या कामासाठी पंचाग घेऊन बसणे मुळीच शक्य नाही. अश्या अनेक अडचणींचा विचार करून आपल्याला प्रवासात ग्रहांची अनुकुलता लाभावी ह्यासाठी सोमवारी दही; मंगळवारी -  गुळ; बुधवारी - पान किंव्हा इलायची, गुरुवारी - बेसनाचे लाडू;  शुक्रवारी – दही किंव्हा काजू खाऊन प्रवास करणे; शनिवारी - लवंग, काळे मिरे अथवा उडीद डाळीचे सेवन करणे; रविवारी - घी अथवा दही खाऊन प्रवास करावा.

असे काही उपाय ग्रंथांद्वारे आपल्या पर्यंत पोहोचवण्याची उपयुक्त आणि महत्वाची कामगिरी आपल्या विद्वान पुर्वाजानंनी केली. आजच्या काळात शक्य असल्यास तीर्थ यात्रेला निघण्याआधी यात्रेच्या आधीच्या तीन रात्री दुध पिऊ नये, पाच रात्री आधी क्षौरकर्म वर्ज मानावे म्हणजे दाढी केस कापू नये. ज्या दिवशी यात्रीला जायचे आहे त्या दिवशी मध खाऊ नये , शरीराला तेल लाऊ नये. यातल्या काही नियमांचा आपण आज निशितच अवलंब करू शकतो.  

तरीही विद्वान पंडितांनी यात्रेचे मुहूर्त काढून देऊन सुद्धा जर मन मानत नसेल तर यात्रा कदापि करू नये. 

शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नागरेषु च

भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पयः

                                                                                        शुभं भवतु

ज्योतिष्याचार्या स्नेहल जरुळकर .....I care where you are unaware

नागपूर, मो. ९८६०४ ४२४२७

                


Comments

  1. Khup sundar lihila aahe. Yatre baddal muhurta cha varnan kharach Khup kamach aahe. Yacha khup fayda hoil saglyana. Special thanks to you for update my knowledge on this subject.

    ReplyDelete
  2. यात्रा संदर्भात महत्वपूर्ण जानकारी, thanks for this important information....and also your guidance...

    ReplyDelete
  3. Khup chhan ani mahatwacha lekh

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मालव्या योग

वार क्रम